पिंपरी : उपवास करणं केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर शरीरासाठीही चांगले मानले जाते. उपवासामुळे शरीराची पचनक्रिया अधिक चांगली होते आणि चयापचय गती वाढते. मात्र, या काळात काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो.
श्रावण महिन्यात भगवान शंकराचा दिवस मानल्या जाणाऱ्या सोमवारचे व्रत आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही श्रावण सोमवारचे उपवास करणार असाल तर उपवासाच्या वेळी कसे निरोगी राहायचे ते सांगणार आहोत.
उपवास करताना या गोष्टींची काळजी घ्या
१) उपवासात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. दररोज ६-८ ग्लास पाणी प्या.
२) अशा फळांचा आहारात समावेश करा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल, जसे की द्राक्षे, लिची, संत्री, मोसंबी इ.
३) रिकाम्या पोटी ॲसिडिटी वाढू शकते, त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने काही फळे खात राहा.
४) तुम्ही सुकामेवा खाऊ शकता, यामुळे आवश्यक ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही.
५) न्याहारीसाठी, तुम्ही दुधासह फळे घेऊ शकता किंवा दुधात भिजवलेले बदाम खाऊ शकता.
६) दुपारच्या जेवणात साबुदाण्याच्या कोणत्याही पदार्थासह दही घेऊ शकता किंवा तुम्ही शिंगाड्याचे पीठ आणि बटाट्यापासून बनवलेल्या पुरीबरोबर दही घेऊ शकता.
७) उपवासाच्या दिवशी सकाळी तुम्ही दूध पिऊ शकता, दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ खाऊ शकता.
८) संध्याकाळी साध्या चहासोबत उपवासाचे चिप्स, भाजलेले मखाने किंवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकता.
९. ताज्या फळांचा रस घ्या.
या गोष्टी टाळा
१) उपवासाला जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढेल. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सर्व आवश्यक पोषक घटक खा.
२) शिंगाड्याचे पीठ आणि बटाटे जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
३) उपवासादरम्यान सुस्ती टाळण्यासाठी पनीर आणि फुल क्रीम दूध टाळा.