पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुण्यात कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्रानं प्रत्येक संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. 1967चा कोयना भूकंप, 1972चा दुष्काळ, 1993चा किल्लारी भूकंप, 2005ची अतिवृष्टी, महापूरासारख्या संकटांचा महाराष्ट्रानं यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात पहिलं पाऊन महाराष्ट्रानं टाकलं. सार्वजनिक वाहतूकीवर बंदी, टाळेबंदीसारखे निर्णय महाराष्ट्रानं सर्वप्रथम घेतले. आर्थिक हानीचा विचार न करता नागरिकांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिलं. आज परराज्यातील साडेसहा लाख मजूरांच्या निवास, भोजन, वैद्यकीय सेवेची व्यवस्था शासकीय यंत्रणांमार्फत केली जात आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. बाहेर दबा धरुन बसलेल्या कोरोनाला स्वत:च्या घरात नेऊ नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा, अशी आवाहनवजा विनंतीही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोरोनावर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरु आहेत. महाराष्ट्रातही त्याचं संशोधन सुरु आहे. या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.