एकीकडे लसीचा तुटवडा असताना आता कोरोना टेस्ट किटचाही तुटवडा दिसतो आहे. सरकारने बंधनकारक केलेल्या चाचण्यांमुळे आता टेस्टींग सेंटर वर लोक गर्दी करत आहेत. त्यातुन अनेकांना परत पाठवण्याची वेळ लॅब वर आली आहे. सरकारने आता ॲण्टीजेन चाचणीला परवानगी दिली तरी मुळातच चाचण्यांचा हा अट्टाहास का असा सवाल आता विचारला जातो आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता लोकांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचे दर १५ दिवसांना टेस्टींग आणि लसीकरण असे धोरण सरकारने स्विकारले आहे. मात्र याचा परिणाम म्हणजे नागरिकांकडुन टेस्टींग सेंटर वर ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट मिळवण्यासाठी गर्दी केली जात आहे. कुठे कामासाठी तर कुठे बाहेरगावी प्रवास करण्यासाठी चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे केंद्रांवरील ताण वाढुन टेस्टींगला २ ते ३ दिवसांचा वेळ लागत आहे.
आता सरकारने नवा आदेश काढत आरटीपीसीआर ऐवजी ॲंटीजेन चाचण्या केलेल्याही चालतील असं सांगितलं आहे. मात्र या गरजु - लक्षण असणाऱ्या लोकांना चाचणीला प्राधान्य मिळेल असे धोरण का ठरवले जात नाही असता सवाल नागरिक विचारत आहेत.
पुण्याचे रहिवासी असणारे मनोज पोचट म्हणाले “ पुण्यातल्या अनेक लॅब कडे टेस्ट किट संपले आहेत. ज्यांच्याकडे शिल्लक आहेत ते रिपोर्ट द्यायला ३-४ दिवस लावत आहेत. “
मराठा चेंबर्स फॅार कॅामर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले “ या रिपोर्ट मुळे लोकांना आपण सुरक्षित आहोत असे वाटुन त्यांच्यामध्ये निष्काळजीपणा वाढु शकतो. तसेच ॲण्टीजेन चाचणीत निगेटिव्ह येण्याची शक्यता ५०% असते. या सगळ्याचा परिणाम म्हणून गरजु लोक वंचित रहात आहेत. त्यामुळे हे धोरण बदलावे अशी आमची भुमिका आहे”
दरम्यान या गोंधळाला नेमकं काय कारणीभूत आहे हे स्पष्ट करताना सबर्बन लॅबचे अभिषेक शिवणकर म्हणाले “ गेल्या काही दिवसांपासुन अनेक जण चाचणी करुन घ्यायला येत आहेत. त्यातच आता या चाचण्या स्वस्त झाल्याने सहजपणे लोक चाचणी करुन घेत आहेत. याचाच परिणाम म्हणजे अहवालाला वेळ लागत आहे”