इंदापूर (बाभुळगाव): इंदापूर शहरातील राज सुपर मार्केट व राज हाॅटेल या दोन दुकानात अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकार्यांनी शुक्रवारी तपासणी केली.यामध्ये १ लाख २७ हजार ३८८ रूपये किमतीचा व शासनाने विक्रीस बंदी घातलेला गुटखा, पानमसाला, सुवासिक तंबाखू असा माल जप्त केला आहे.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी बाळकृृृष्ण अंकुश यांनी दोन जणांविरोधात इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पदमाकर नरहरी तांदुळकर (वय ४७),व अजिज नूरमहंमद मोमीन (वय ५३,दोघेही रा.कसबा, इंदापूर,जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शुक्रवारी(दि. १२) सायंकाळी कसबा येथील मेसर्स राज सुपर मार्केट या दुकानात तपासणी केली असता सुगंधी व सुवासिक तंबाखु, पान मसाला असा एकुण १ लाख २० हजार ९३८ रूपये किमतीचा अवैध गुटखा मिळून आला.तर त्याचदिवशी राज हाॅटेलमध्ये ६ हजार ४५० रू.किमतीचा अवैध गुटखा आढळुन आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अन्न व सुरक्षा विभागाकडुन दोन जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.