पुणे : झाेमॅटाे कंपनीच्या डिलिव्हरी बाॅयने पाळीव कुत्र्याचे अपहरण केले असल्याची तक्रार पुण्यातील कर्वे राेडला राहणाऱ्या एका महिलेने केली आहे. ट्विटरवर तिने सर्व प्रकार कथन केला आहे. पाेलिसांनी मदतीचे आश्वासन दिले असले तरी याबाबतची तक्रार त्यांनी घेतली नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
वंदना शहा या महिलेने ट्विटरवर या घटनेबाबत माहिती दिली आहे. साेमवारी त्यांचे दत्तू नावाचे बेगल जातीचे कुत्रे त्यांच्या घराच्या परिसरात खेळत हाेते. काही तासांनंतर कुत्रे दिसून न आल्याने शहा यांनी शाेधाशाेध सुरु केली. जवळील एका खाद्यपदार्थाच्या स्टाॅलवर त्यांनी चाैकशी केली तेव्हा तेथे काम करणाऱ्या झाेमॅटाेच्या एका डिलिव्हरी बाॅयच्या हातात कुत्रे दिसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या कुत्र्याचा व डिलिव्हरी बाॅयचा फाेटाे देखील मिळाला. त्या डिलिव्हरी बाॅयचे नाव तुषार असल्याचे समाेर आले.
शहा यांनी डिलिव्हरी बाॅयचा फाेन नंबर मिळवून त्याला कुत्रे परत करण्यास सांगितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच कुत्रे गावाला पाठवून दिले असल्याचे त्याने शहा यांना सांगितले. त्यानंतर शहा यांनी झाेमॅटाे कंपनीकडे याबाबत तक्रार देखील केली असून पाेलिसांकडेही त्यांनी डिलिव्हरी बाॅयच्या विराेधात तक्रार केली आहे. दरम्यान पाेलिसांनी मदतीचे आश्वासन दिले असले तरी तक्रार नाेंदविण्यास नकार दिल्याचे शहा यांचे म्हणणे आहे.