पिंपरी : अन्न व औषध विभागाच्या परिमंडळ चारच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वर्षभरात ८९ ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली. जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पिंपरी - चिंचवड हद्दीत टाकलेल्या धाडींत सुमारे २२ लाख ८१ हजार किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करुन नष्ट करण्यात आला. वर्षभरात अन्न आस्थापनेकडून २८२ तपासण्या घेण्यात आल्या. त्यातील ७८ प्रकरणांतील तडजोडीत २० लाख ६३ हजारांची दंडवसुली करण्यात आली. शहरातील विविध स्वीट होमवर अन्न विभागातर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यांत तब्बल २० लाख ६२ हजार रुपये किमतीचा एक हजार ४८ किलो मिल्क केक व स्पेशल बर्फीची जप्ती करण्यात आली. ती शहरातील अन्नपदार्थांतील सर्वांत मोठी कारवाई होती. अन्न औषध विभागाने केलेल्या करावाईत वर्षभरात दोन हजार ४२२ किलो भेसळयुक्त साठा सापडला. त्याची किंमत सुमारे २१ लाख ४७ हजार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत तपासणीसाठी १८६ नमुने घेण्यात आले होते. त्यातील २४ नमुने असुरक्षित आढळून आले. तर २१ नमुने कमी दर्जाचे आढळले. असुरक्षित आढळलेल्या नमुन्यातील खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
अन्न विभागाचे वर्षभरात ८९ छापे
By admin | Published: March 03, 2016 1:29 AM