बारामती : बारामती शहरात वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन सुरु आहे. या काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. यामध्ये दररोज अन्न मागून जगणारे निराधार, कोरोनाबाधित रुग्ण व मोलमजुरी करणारे कुटुंब, भिक्षा मागणारे, मजूर अड्डा, रेल्वे स्टेशन, शहरातील मंदिर परिसरातील भुकेल्यांची भूक भागविण्यासाठी दररोज अन्नदानाचा उपक्रम राबविला जात आहे.
माणसाच्या मनात श्रद्धा असेल, निरपेक्ष समाजसेवेची ऊर्मी असेल, तर आपण कोणतेही काम करु शकतो. ऐन ‘लॉकडाउन’मध्ये अनेकांची रोजगार गेल्याने उपासमार होत आहे. यामध्ये उघड्यावर संसार असणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. या संकटकाळात सापडलेल्या बांधवांसाठी गुनवडी (ता. बारामती) येथील शेतकरी पुत्र व सह्याद्री डेअरीचे मालक उद्योजक सचिन घाडगे या दानशूर युवकाने माणुसकीचा हात पुढे केला आहे. हे माणुसकीचे दर्शन गरजूंना साहाय्यभूत ठरत आहे.
जिल्ह्यात रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाने जिल्हाभरात संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाउनही पाळले जात आहे. तसेच गोरगरीब जनतेला उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या सध्याच्या संकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी, असा संदेश सचिन यांनी दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती आजारी पडली असल्यास त्या व्यक्तीला जेवणाचा डबा देण्यासाठी असंख्य नातेवाईक,मित्र परिवार धावून जात असत. दवाखान्यात भारती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना डबा घेऊन येऊ का डबा आणतो ,असे विचारले जात असे ,डबे दिले जात असत. प्रत्यक्ष भेटून चौकशी केली जात होती.मात्र ,कोरोनाने या सर्व मदतीलाच आडकाठी आणली आहे.मात्र आशा वातावरणात घाडगे व त्यांचा मित्र परिवार यांनी सर्वांची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे संकटकाळात अनेकांची उपासमार टळली आहे. सकाळी व संध्याकाळी रोज सुमारे चारशे लोकांना जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत.या कामी युवा उद्योजक सचिन घाडगे,योगेश दळावी,प्रमोद शिंदे,अमित गावडे,सचिन वाबळे,विकास घाडगे,ओम सातव,वेदांत माने आदींचे सहकार्य लाभात आहे. कोणाचीही मदत घेता या लोकांनी राबविलेल्या अन्नदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारामतीत अन्नदान करत असताना सह्याद्री डेअरीचे पदाधिकारी.
०७०५२०२१ बारामती—०४