पुणे : पुण्यात ‘फूड पॉयझनिंग’चे रुग्ण आढळून येत असून, त्यासाठी आजपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यात अन्न निरीक्षकाद्वारे अन्न तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध विभाग (एफडीए)चे पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश अण्णापुरे यांनी दिली.
सध्या पुण्यात फूड पॉयझनिंग हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत दैनिक लोकमतने रविवारी, दि. २० ऑगस्ट राेजी ‘व्हायरल गेले, मग डोळे आले, आता फूड पॉयझनिंग वाढले’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. यावर ‘एफडीए’चे हॉटेल तपासणीकडे झालेले दुर्लक्ष यावरही बोट ठेवले होते. यानंतर, एफडीए विभाग खडबडून जागा झाला असून, आजपासून (दि. २१) शहर व जिल्ह्यात अन्न तपासणी करण्याचे आदेश सहआयुक्त अण्णापुरे यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की, ‘प्रत्येक अन्न निरीक्षक यांना पाच अन्न नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पुढील कार्यवाही करण्यात येईल.’