पुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, नोकरदार मध्यमवर्गीय कुटुंबांकडे किमान काही साठा असतो. मात्र हातावर पोट असणारे त्याबाबत काहीच करू शकत नाहीत. त्यांचे या काळात बरेच हाल होणार आहेत. ते होऊ नयेत यासाठी त्यांना किमान दरात शिधापत्रिकेवर काही ऊपलब्ध होईल याची व्यवस्था सरकारने करावी. त्यातून त्यांना निदान खाण्यासाठी काहीतरी मिळेल. ही सुविधा तातडीने सुरू केलीत तर असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगार, छोटे व्यावसायिक व गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येणार नाही आणि ते राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन घरी थांबू शकतील. त्याचा फायदा साथ थांबण्यासाठी होऊ शकेल असे किर्दत म्हणाले. समाजातील एक मोठा वर्ग या बंदीत होरपळून निघत आहे. घरात काही खायला नसेल तर मोठ्यांसह मुलाबाळांचेही हाल होतात. त्यांना सहजपणे अन्नधान्य ऊपलब्ध झाले तर ते किमान आपला स्वाभिमान टिकवून ठेवू शकतील. त्यामुळे सरकारने त्वरीत यात लक्ष घालावे अशी मागणी किर्दत यांनी केली. पुण्यातच असे काही लाख लोक असून ते सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत असे ते म्हणाले.
शिधा पत्रिकेवर धान्य व दैनंदिन गरजेच्या गोष्टी उपलब्ध कराव्यात ;आपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:20 AM