पुणे : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाने पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना कात्रज येथील ऑफिसवर बोलावून, प्रत्येक महिन्याला एक कोटी रुपये देण्याची, तसेच नुकत्याच होणाऱ्या टेंडरमधून ५ कोटी रुपये देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य न केल्याने तानाजी सावंत यांनी भगवान पवार यांचे निलंबन केले असा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
डॉ. पवार यांना नुकतेच महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यावर धंगेकर यांनी हा आरोग्यमंत्र्यावर आरोप केल्याने आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. धंगेकर म्हणाले, की डॉ. पवार यांनी शिफारस केली नसताना त्यांना आरोग्य प्रमुख पदावर आणले. त्यानंतर त्यांच्या मुलाने डॉ. पवार यांना कात्रज येथील ऑफिसवर बोलावून महिन्याला एक कोटी देण्याची मागणी केली.
तसेच, टेंडर त्यांच्या माणसाला देऊन त्याद्वारे महिन्याला पाच कोटींची मागणी केली, असे म्हटले आहे. हा कुठला न्याय आहे, कुठले प्रशासन आणि कुठली लोकशाही आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या सरकारच्या सर्व खात्यांत भ्रष्टाचार सुरू असल्याचे सांगत तानाजी सावंत हे सज्जन माणूस, नसून प्रचंड भ्रष्टाचारी असल्याचेही वक्तव्य धंगेकर यांनी केले आहे.