कळस: पुणे जिल्हाच्या पश्चिम घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुणे सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के शंभर टक्के भरले आहे. सोमवारी सकाळी उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख ८० हजार क्युसेकपर्यंत वाढला. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सकाळी ११ वाजता तब्बल १ लाख क्युसेक पाणी प्रवाह वाढवण्यात आला. दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत नृसिंहपूरजवळ येत आहे. त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणात एकूण पाणीसाठा ११७ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ५३ टीएमसी म्हणजे टक्केवारी ९९ टक्के एवढी झाली आहे. पुण्यातील खडकवासला, बंडगार्डनमार्गे दौंडमार्गे पाण्याचा विसर्ग दीड लाख क्युसेकच्या पुढे सरकल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात तसेच भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
नदी पात्रात १ लाख क्युसेक धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक असे मिळून १ लाख १ हजार ६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमा व नीरा नदीचे पाणी नृसिंहपूरजवळ भीमा-नीरा नदीच्या संगमात मिसळते. नंतर हे पाणी भीमा नदीवाटे पंढरपूरच्या दिशेने येत आहे. त्यामुळे पंढरपुरात नदीला पूर येण्याची शक्यता असते.
५ ऑगस्ट रोजी उजनी धरणाची सकाळची स्थिती
दौंड विसर्ग - १ लाख ८२ हजार १५२एकूण टीएमसी - ११६.२९उपयुक्त साठा - ५२.६३टक्के वारी , ९८.२३नदी पात्र विसर्ग १ लाख क्यूसेकपावर हाऊस १६०० क्यूसेक
सकाळी ९ वाजता उजनी धरणातून नदीपात्रात ८० हजार क्यूसेक विसर्ग होता मात्र धरणात मोठा पाणीसाठा वाढत असल्याने नदीपात्रात ११ वाजता १ लाख क्यूसेक पर्यंत विसर्ग करण्यात आला आहे याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन जिल्हा प्रशासनाला कळिवण्यात आले आहे. - रावसाहेब मोरे कार्यकारी अभियंता, उजनी धरण