पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी चक्क मुळा नदीचा प्रवाह अडवला आहे. यात मेट्रोमार्गाचे खांब बसवण्यासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकल्याने पाणी साठून राहिले आहे. या कामासाठी चक्क मुळा नदीचा गळा आवळल्याचे बाेलले जात आहे.
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचा मार्ग मुळा नदी ओलांडून पुढे जातो. नदी ओलांडण्यासाठी नदीपात्रातच खांब टाकले जात आहे. ते काम करता यावे यासाठी नदीपात्रात मातीचा मोठा भराव टाकून नदीचे पाणी अडवले आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी- पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) एका खासगी कंपनीकडून हे काम सुरू आहे.
जैवविविधतेचे माेठे नुकसान
नदीपात्रात भराव टाकून मोठमोठी यंत्र त्यावर चढवून काम केले जात आहे. त्यामुळे नदीपात्राची माेठ्या प्रमाणावर नासधूस होत आहे. यात नदीतील जैवविविधतेचे माेठे नुकसान होत असल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे.
निर्बंध पाळून मुठापात्रात काम
महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचे काम सुरू असताना मुठा नदीपात्राला समांतर असे खांब टाकणे गरजेचे होते. त्या कामावर पुण्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली होती. राष्ट्रीय हरित प्राधिकरणापर्यंत (एनजीटी) व नंतर थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते. न्यायालयाने महामेट्रो कंपनीला पर्यावरण जपणारे अनेक निर्बंध टाकून काम करण्याला परवानगी दिली होती, त्याप्रमाणे सर्व निर्बंधांचे तज्ज्ञाच्या सल्ल्याने पालन करून महामेट्रोने नदीपात्रातील त्यांचे मेट्रो मार्गाचे खांब टाकण्याचे काम पूर्ण केले.
पाइल्स घेण्याचे काम सुरू
शिवाजीनगर हिंजवडी मार्गावर मुळा नदीपात्रात सुरू असलेल्या या कामावर अजून कोणी हरकत घेतलेली नाही. यात पूर्ण नदीपात्रच अडवण्यात आले असून, नुकतीच तिथे कामाला सुरुवात झाली आहे. वाहते पाणी अडवल्याने नदीत मागील बाजूला पाण्याचा फुगवटा तयार झाला आहे. सध्या खांबांसाठी नदीपात्रातच पाइल्स (खांबांचा पाया घेण्यासाठी नदीपात्राला मोठी छिद्र पाडणे) घेण्याचे काम सुरू आहे.
परवानग्या घेतल्या का?
पक्के बांधकामसदृश कोणतेही काम नदीपात्रात करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे असे काहीही काम करायचे असेल तर अनेक विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. हे काम खासगी कंपनीकडून होत असले तरीही ते बंधन आहे.
पीएमआरडीएचा ‘नाे रिस्पाॅन्स’
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या कामाचे नियंत्रण आहे. त्यांच्याच माध्यमातून खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. खासगी ठेकेदाराने नदीपात्रातील कामाची परवानगी घेतली आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी पीएमआरडीएबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
नागरिकांच्या मताकडे दुर्लक्ष
काम पूर्ण झाल्यानंतर ३५ वर्षांच्या कराराने ही मेट्रो चालवण्यासाठी खासगी कंपनीकडेच असणार आहे. सर्व मान्यता मिळाल्यानंतरही काम सुरू करण्यास कंपनीला विलंब झाला होता. त्यानंतर झालेल्या टीकेमुळे काम सुरू झाले, मात्र आता विशिष्ट टप्प्यातील काम केले जात आहे. त्यातही स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करणे, त्यांना कामाची पूर्वकल्पना देऊन त्यांचे सहकार्य मिळवणे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
''मुळातच नदीपात्रात असे कायमस्वरूपी पक्के बांधकाम करणे अयोग्य आहे. तरीही कामाची गरजच असेल, त्यात सार्वजनिक हित असेल, तर किमान त्यासाठीच्या नियमांचे पालन करायला हवे. खांब उभे केल्यानंतर त्यांचा भलामोठा चौकोनी पाया नदीच्या तळाशी राहणे गरजेचे आहे. तो नदीच्या पाण्यावर आल्यास प्रवाहाला अडथळा होताे. तसेच काम पूर्ण झाल्यावर पात्रात टाकलेला मातीचा भराव काढून घेणे गरजेचे आहे. तसे पत्र पीएमआरडीएला देणार आहे. - सारंग यादवाडकर, पर्यावरणप्रेमी''