पुणे : ढोलताशांचा नाद, वैभवशाली परंपर, शिस्तबध्दता अन् गणपती बाप्पा मोरयाचा गजर...अशा अतिशय प्रफुल्लीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पुण्यातील मानाच्या गणरायांची विसर्जन मिरवणूक मंगळवारी (दि.१७) सकाळी १०.१५ मिनिटांनी सुरू झाली. तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता मिरवणुकीची सांगता झाली. उत्साहात सुरु असणाऱ्या मिरवणुकीचा यंदाही सलग ६९ व्या वर्षी कासेवाडीच्या महाराष्ट्र तरुण मंडळाकडून भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
काल सकाळी नयनरम्य अन् कर्णमधूर असे ढोलताशा पथकांचे वादन, गणरायावर इमारतींवरून होणारा फुलांचा वर्षाव करत पाचही मानाच्या गणरायांना सायंकाळी निरोप देण्यात आला. वेळेत विसर्जन करण्याचा ‘मान’ पाचही मानाच्या गणरायांनी पाळला. ढाेल ताशांचा ताल, मध्येच उधळला जाणारा गुलाल, रंगीबेरंगी रथ त्यावर केलेली राेषणाई आणि पारंपारिक वादयांच्या ठेक्यावर थिरकणारी तरूणाई असे उत्साही स्वरूप लक्ष्मी रस्त्यावर ‘श्रीं’ च्या विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्रीपर्यंत दिसून आले.
पुण्यात लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या प्रमुख रस्त्यांवरून जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जातो. लक्ष्मी रस्त्यावरून मानाचे आणि प्रतिष्ठित मंडळे जातात. त्यामागोमाग इतर मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. तर इतर तीन रस्त्यांनी सुद्धा बाप्पांच्या मिरवणुका सुरु असतात. रात्री १२ नंतर स्पीकरला बंदी असल्याने केळकर, टिळक रस्त्यावर मंडळे ६ तास मिरवणुका थांबवतात. व सकाळी ६ वाजता स्पीकर लावून सुरुवात केली जाते. त्यामुळे दरवर्षी २५ ते ३० तास मिरवणुकींचा उत्साह सुरु असतो. तसेच या रस्त्यांवर मंडळांचे प्रमाण जास्त असल्याने मिरवणुकांना विलंब होत असतो. यावर्षी दुपारी ३ वाजेपर्यंत मिरवणुका संपल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तब्बल २८ तास यंदाचा विसर्जन सोहळा सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र तरुण मंडळ गेली ६९ वर्ष या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता करत आहे. यावर्षी सुद्धा मिरवणुकीची सांगता करण्याचा सन्मान मंडळाला मिळवून दिल्याबद्दल मंडळानी पोलिसांचे आभार मानले.