पांडुरंग मरगजे
धनकवडी : ध्येय गाठण्यासाठी अविरत प्रयत्न केले तर अशक्य काहीच नसते. हेच दाखवून दिले आहे. भारती विद्यापीठमध्ये रखवालदार म्हणून काम राहणाऱ्या कुंडलिक साळुंखे यांच्या समाधान साळुंखे या जिद्दी मुलाने, सनदी लेखपाल होण्यासाठी 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'ने मे २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत हा समाधान उत्तीर्ण झाला आणि त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत असून वडील कुंडलिक साळुंखे यांना अश्रू अनावर झाले.
कुंडलिक साळुंखे वेल्हा तालुक्यातील रहिवासी, मोलमजुरी करून घर चालवत, परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मोलमजुरीचे पैसे घरसंसार व मुलाचे शिक्षण यासाठी अपुरे पडू लागले, कधी कधी हाताला काम मिळत नसे त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी घर सोडलं अन् मुंबई गाठली. मुंबईमध्ये सात वर्षे हमाली केली, ओझी उचलून मानेजवळील मणक्यात गॅप पडली त्यामुळे काम गेले. मुलाचे शिक्षण थांबेल त्यामुळे काय करावं असा प्रश्न होता. अखेर त्यांनी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला, पुण्यात भारती विद्यापीठमध्ये रखवालदाराची नोकरी मिळाली.
रखवालदार वडिलांनी मुलाच्या स्वप्नांच्या आड आपली आर्थिक परिस्थिती कधी येऊ दिली नाही आणि मुलाने ही जिद्दीने अभ्यास केला. समाधानचे प्राथमिक शिक्षण वेल्हा तालुक्यातील कोळवडी येथील जिल्हा परिषद शाळेत तर आठवी ते दहावी श्री सरस्वती विद्यालय मांगदरी येथे झाले. समाधानने दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातूनच घेतले.
दहावीमध्ये असतानाच, सनदी लेखापाल ही पदवी मिळवायची असं स्वप्न पाहिलं आणि इंग्रजी कॉमर्समध्ये शिक्षण घ्यायचे ठरवले. गावी इंग्लिश कॉमर्स नसल्याने अकरावी आणि बारावी अभिनव कॉलेज आंबेगाव येथून केली. आणि मग पुढचा सीएचा प्रवास सुरू झाला.
अन् पहिल्याच प्रयत्नांमध्ये सीए परीक्षा पास झाला
माझ्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. आमच्या घरची परिस्थिती हलाखीची आणि नातेवाइकांमध्ये कोणी उच्च शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे असंख्य अडचणी, मात्र ध्येय एकच सीए, या उम्मेदीमुळे अभ्यास करू शकलो. त्या बरोबरच आईवडिलांचे कष्ट डोळ्यांनी पाहिले अन् पहिल्याच प्रयत्नांमध्ये सीए परीक्षा पास झाला. - समाधान साळुंखे