पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेने सासवड ते नीरा या मार्गावर बस चालवली. अर्चना अत्राम असे पहिल्या महिला एसटी बस चालकाचे नाव आहे. गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता अत्राम या सासवड डेपोतून निरासाठी बस घेऊन गेल्या. यावेळी बसमध्ये १७ प्रवासी होते. अत्राम यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या गुरूवारी सासवड आगारात रुजू झाल्या. एसटी महामंडळामध्ये याआधी महिला वाहक म्हणून काम करत होत्या, पण पहिल्यांदाच एक महिला चालक म्हणून महिला स्टेअरिंगवर बसल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
अत्राम यांनी बस चालवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी अक्षरश: कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ट्विटद्वारे अत्राम यांचे अभिनंदन केले. नवीन जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहचवण्याची. एसटीच्या इतिहासामध्ये राज्यात पहिल्यांदाच अर्चना अत्राम यांनी बस चालवून इतिहास घडवला. राज्य महिला आयोगाच्या वतीने अत्राम यांचे अभिनंदन असे या संदेशामध्ये म्हटले आहे.
१७ महिलांची लवकरच नियुक्ती...एसटी महामंडळाने दीड ते दोन वर्षांपूर्वी महिला चालकांची भरती केली होती. त्यावेळी ३० ते ४० महिला चालकांची भरती करण्याचे नियोजन होते. त्यापैकी १७ महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्या लवकरच पुणे विभागात रुजू होणार आहेत.
सासवड डेपोमध्ये अर्चना अत्राम रुजू झाल्या आहेत. त्यांना सासवड ते निरा मार्गावर पाठवले होते. त्यांनी उत्तमरीत्या आपले काम पार पाडले. त्या बस चालवण्यासाठी खूप उत्साही होत्या.- प्रवीण मालशिखरे, आगार व्यवस्थापक, सासवड
पुणे विभागातील सासवड आणि शिरूर डेपोमध्ये ३-३ अशा ६ महिला चालक रुजू झाल्या आहेत. त्या नवीन असल्याने ग्रामीण भागातील मार्गांवर त्यांना पाठवले जात आहे. सध्यातरी त्यांना लांबपल्ल्याच्या मार्गावर पाठवले जाणार नाही. तसेच रात्रपाळी देखील दिली जाणार नाही.- सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी