पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी पुणे जिल्ह्यात सुरळीत पार पडली. ३१ हजार परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. दरम्यान, आयोगाने डमी उमेदवारांना चाप लावण्यासाठी प्रथमच परीक्षार्थींचे परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या डाेळ्यांचे बुबूळ स्कॅनिंग करून आत साेडले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी ३७ हजार ८५० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३१ हजार १३५ स्पर्धा परीक्षार्थींनी ९३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली, तर सहा हजार ७१५ परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर हाेते. त्यापैकी ६७ केंद्र पुणे शहरात, १६ पिंपरी-चिंचवड तर १० केंद्रे पुरंदर आणि खेड हद्दीत होते.
राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता उमेदवारांना सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले हाेते. तसेच हजेरी घेण्यात येत हाेती. सर्वच परीक्षा केंद्रांवर अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गातील कामकाजाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. परीक्षेनंतर संबंधित चित्रीकरण तपासण्यात येईल व आयोगाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवार आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेचे पेपर काहीसे अवघड होते. त्यामुळे उत्तरसूची आल्यानंतरच परीक्षेचा कटऑफ आणि अन्य बाबीसंदर्भात बोलता येणार आहे, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले की, परीक्षेत अनुचित प्रकार न हाेता सुरळीत पार पडली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर चार लोक परीक्षेचे पाहणी करण्यासाठी नेमण्यात आले होते. एका केंद्रावर कमीत कमी २०४ ते ५२४ परीक्षार्थी परीक्षेसाठी हजर होते. त्यांची बायोमेट्रिक किंवा बुबूळ स्कॅनद्वारे उमेदवारांची हजेरी घेण्यात आली.