पुणे : भारतीय जनता पक्षाची पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर झाली. त्यानंतर मोहोळ यांची मित्रमंडळी, भाजपचे पदाधिकारी, अशा अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या. तुम्ही लोकसभेच्या संधीचं नक्कीच सोनं कराल अशा प्रतिक्रिया मोहोळ यांना येऊ लागल्या आहेत. अशातच त्यांचे खास मित्र अभिनेते प्रवीण तरडे यांनी मुरलीधर मोहोळ यांना फेसबुकवर खास पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. पुढची २५ वर्षे पुण्याला खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला अशी प्रतिक्रिया तरडे यांनी दिली आहे.
तरडे म्हणाले, मित्रवर्य मुरलीधर खुप शुभेच्छा. सांस्कृतिक पुण्याला सुसंस्कृत खासदार मिळावा ही प्रत्येक पुणेकराची ईच्छा पुर्ण होण्याच्या दृष्टीने आज पहिलं पाऊल पडलं. मुरलीधर मोहोळ प्रत्येक पुणेकराची पहिली पसंती असेल यात शंका नाही. कारण पुण्याचा महापौर असताना आमच्या या मित्रानं कोरोना काळात कुटुंब जपावं तसं अख्खं पुणे शहर जपलं. त्यामुळे आता देशासाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पुणेकर त्याला विक्रमी मताधिक्क्याने मोदींचा शिलेदार म्हणुन दिल्लीला पाठवतील. रांगड्या मातीतला हा देखणा मुरलीधर त्याच्या आक्रमक कामा बरोबरच लाघवी स्वभावा साठी सुध्दा प्रसिध्दं आहे.. त्याचं वय पहाता पुढची २५ वर्षे पुण्याला खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला असच वाटतय.
मोहोळ यांनी महापालिकेच्याच विसर्जित सभागृहात एकाच पंचवार्षिकमध्ये स्थायी समिती अध्यक्ष व नंतर महापौर अशी दोन पदे मिळवली. त्यातही महापौर म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली. सध्या ते प्रदेश सरचिटणीस म्हणून पक्षाचे काम पाहतात. पक्षाने दाखवलेला विश्वास महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर व्यक्त केली. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हे देशातील जनतेची इच्छा आहे. पुणेकर यात मागे राहणार नाही, तेही मोदी यांच्याबरोबरच असतील असे मोहोळ यांनी सांगितले.