दादा, आता तुम्ही मागे फिरु नका, अपक्ष लढा : नाराज गायकवाडांना समर्थकांचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:22 PM2019-04-02T12:22:13+5:302019-04-02T12:29:36+5:30
तिकीट मिळेल या अपेक्षेने प्रवीण गायकवाड यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. दिल्लीमधे काही दिवस मुक्कामी राहून त्यानी उमेदवारी साठी प्रयत्न केले. सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाने चाळीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली
पुणे :काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे जल्लोषात केलेला कांग्रेस प्रवेश, पुण्यातील लाल महाल येथे घेतलेली समविचारी पक्षांची बैठक, रविवारी काँग्रेसच्या पदयात्रेतील त्यांचा उत्साह हे वातावरण पाहता काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांसह, शेतकरी कामगार पक्ष, आदी संघटनांची प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी मिळणार अशी स्वतःच्या मनाची पक्की धारणा केली होती. पण सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाने चाळीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. या निर्णयाने शेतकरी कामगार पक्षातून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड नाराज असल्याचे समजते. त्यांच्या समर्थकानी 'दादा, तुम्ही आता मागे फिरू नका, अपक्ष लढाच' असा आग्रह सुरु केला आहे. त्यामुले आता त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकीट मिळेल या अपेक्षेने गायकवाड यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. दिल्लीमधे काही दिवस मुक्कामी राहून त्यानी उमेदवारी साठी प्रयत्न केले. पण बाहेरचा उमेदवार म्हणून स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. यामध्ये उमेदवारी मिळालेले मोहन जोशी, महापलिकेतील गटनेते अरविंद शिंदे व प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांचा समावेश होता. त्यामुळे गायकवाड याना आधी कांग्रेसमधे प्रवेश करा, मग तिकिटाचे बघू, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी शनिवारी शेकडो कार्यकर्त्यासह मुंबईत पक्षप्रवेश केला. त्यादिवशी ते सायंकाळपर्यंत मुंबईतच थांबून होते. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा होती. दुसया दिवशी त्यानी लाल महाल येथे समविचारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. 'आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातुन नाही तर लाल महालमधून चालणार' असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास त्यांचा बोलण्यातुन दिसत होता. त्यानंतर ते कार्यकर्त्यासह कांग्रेसच्या पदयात्रेतही सहभागी झाले.
पण, जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने गायकवाड नाराज झाल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. रात्रीपासूनच कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. त्याना अपक्ष लढण्यासाठी आग्रह केला जात आहे. पण, याबाबत तड़काफड़की निर्णय घेणार नसल्याचे निकटवर्तियांकडून सांगण्यात आले आहे. आज किंवा उद्या कार्यकर्त्यांची बैठक घेउन याबाबत निर्णय घेतील अशी चर्चा आहे. दरम्यान, याबाबत गायकवाड यांनी मोबाइल बंद करून ठेवल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
-------+++
काँग्रेसमधे प्रवेश करण्याच्या एक दिवस आधी गायकवाड यानी युवक काँग्रेसच्या बैठकीत आपण उमेदवारीसाठी आग्रही नसल्याचे जाहीर केले होते. उमेदवारी नाही मिळाली तरी काँग्रेसचे काम करणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले होते. त्यामुळे या भुमिकेवर ते ठाम राहणार की अन्य मार्ग निवडणार याची उत्सुकता आहे.
-------