--
रांजणगाव सांडस : ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. वीजबिलवसुली करण्यासाठी महावितरणकडून जबरदस्ती केली जात असून वीजबिल न भरणाऱ्या शेतक-र्यांचे विद्युत कनेक्शन खंडित केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला असून शेतामधील उभी पिके जळून जाऊ लागली आहेत.
शिरूर तालुक्यात भीमा नदीवर मांडवगण फराटा बंधारा, पारगाव नागर गाव बंधारा, आलेगाव पागा बंधारा बांधल्याने शेतकरीवर्गाला शेतीसाठी बारमाही पाणी असते. त्यामुळे शेती बागायती झाली आहे पण उन्हाळ्यात नदीला पाणी असून वीजपंप बंद असल्याने पिके शेतात जळत आहे. घोडनदी कोरडीठाक पडली आहे. अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद आहेत. विहिरी, बोअरवेल हे बंद पडलेले असून पाणी पिण्याची समस्या जाणवू लागली आहे. कोरोनामुळे अस्थिर परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या तरकारी, फळपिके, कांदा, पालेभाज्या यांचे बाजारभाव पूर्णपणे ढासळलेले, शेतमालाला बाजारभाव नाही अशी परिस्थिती आहे.
कडक उन्हाळ्यामुळे शेतातील पिकांना दोन ते तीन दिवसाला पाणी द्यावे लागते. अनेकांची तरकारी पिके हातातोंडाशी आली आहे. कलिंगड, खरबूज आदी फळपिके पाणी वेळेत मिळत नसल्याने सुकून जाऊ लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे जनावरांना ही पाणी कसे द्यायचे असा सवाल पशुपालकांनी केला आहे.
वीजपंपाला मीटर बसविलेला असून मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारणी न होता अनेक शेतकरीवर्गाला अंदाजे रीडिंग आकारणी करून भरमसाठ वीजबिल आल्याने विजेचा धक्का शेतकरीवर्गाला बसला आहे. ज्या शेतकरीवर्गाची विहीर बोअरवेल पाण्याअभावी वीजपंप बंद असूनही बिल आल्याने शेतात पीक नाही पंप बंद, तरी वीजबिल आले आहे. अशा शेतकरीवर्गाचे पंप बंद पाहणी करून बिल आकारणी करावी
पांडुरंग आण्णा लोखंडे शेतकरी
.
--
मार्च एण्डचा भरणा आणी वीजबिलाची लगीनघाई
--
मार्च महिना असल्याने सोसायट्या, सहकारी संस्था, बँकांचे हप्ते यांचा भरणा शेतकऱ्यांना मार्चअखेर पूर्ण करावाच लागतो. त्याशिवाय त्यांना नवीन आर्थिक वर्षात कर्जे घेणे शक्य होत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना भरमसाठ वीजबिले कशी भरायची, हा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वीजबिल एवढे भरा नाही भरले तर तुमचे कनेक्शन कट करू, तुमच्या ट्रान्सफॉर्मर बंद करू असा इशारा महावितरणकडून दिला जात आहे. तसेच काही शेतकऱ्यांची वीजबिले भरून देखील त्यांची कनेक्शन जोडली जात नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांची ही अडवणूक केली जात आहे, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.