पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी सुनावली. दंडाची रक्कम भरल्यास अपील कालावधी संपल्यानंतर पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. शिक्षक हा मुलांचे भविष्य घडवत असतो. मात्र, आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे आयुष्य बिघडून टाकले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील ॲड. सुचित्रा नरोटे यांनी युक्तिवादात केली. त्यानुसार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
गोपाळ किसनराव चव्हाण (वय ३३) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. डिसेंबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीत निगडी परिसरात हा प्रकार घडला. पिंपरी पोलिसांत या प्रकरणात गुन्हा दाखल होता. चव्हाण हा पार्टनरशिपमध्ये खासगी कोचिंग क्लास चालवत होता. त्याच्या क्लासमध्ये शिकवणीसाठी येणाऱ्या पीडितेला त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. सुचित्रा नरोटे यांनी ८ साक्षीदार तपासले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकरराव अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख यांनी तपास केला. हवालदार भोसले यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले.