पिंपरी (पुणे) : तरुणीचा तिच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीबरोबर बळजबरीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने आई-वडिलांसह १३ जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.दीप्ती गायकवाड (रा. जुनी सांगवी) असे फिर्यादी तरुणीचे नाव आहे. अनिता गायकवाड (३६), दयानंद गायकवाड (४६) या आई-वडिलांसह श्यामा मच्छिंद्र माने (५४), मच्छिंद्र माने (४६), रवी माने (२९), श्यामल रवी माने (२५), रुपाली राहुल भांडळे (३०), राहुल भांडळे (३१), उत्तम विठ्ठल माने आणि इतर चारजण अशा एकूण १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.कोणतीही पूर्वकल्पना न देता दीप्तीचे लग्न ठरविण्यात आले. नवऱ्या मुलाला कधीही पाहिले नसल्याने त्या व्यक्तीशी लग्न करण्यास तिने नकार दिला. मात्र, मुलगा पाहण्यास जायचे आहे, असे खोटे सांगून दीप्तीला बळजबरीने उस्मानाबाद येथील तेरखेड गावी नेले. तेथे उत्तम माने या ४६ वर्षे वयाच्या व्यक्तीला नवरा मुलगा म्हणून पुढे आणले. ‘नवरा मुलगा वडिलांपेक्षा मोठा दिसतो. त्याचे पहिले लग्न झाले असावे, असा अंदाज व्यक्त करून दीप्तीने लग्नाला नकार दिला. तसेच २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे पालकांना सांगितले. २२ मार्च रोजी दीप्तीला मोटारीत बसवून आळंदी येथे आणून बळजबरीने तिचे त्या व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले.
बळजबरीने शुभमंगल; तरुणीची पोलिसांत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:25 AM