पुणे: शहरातील बहुप्रतिक्षित चांदणी चौक उड्डाणपुलाचे काम केवळ दीड टक्का म्हणजे एक हेक्टर भूसंपादनाअभावी रखडले आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने संबंधित जागा मालकांसोबत सर्व प्रकारच्या तोडजोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु त्यानंतर देखील केवळ प्रशासनाची अडवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अखेर प्रशासनाने शिल्लक एक हेक्टर जागेचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातील लेखी पत्र जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. चांदणी चौक येथील दोन मजली उड्डाण पुलाचे काम भुसंपादन होत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. भूसंपादन वेळेत करून घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने महालिकेकडे केल्यानंतर या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सप्टेंबर २०१७ मध्ये करण्यात आले. परंतु, त्यानंतर देखील एक-दीड वर्षे भूसंपादना अभावी काम सुरु करण्यामध्ये अडचणी येत होत्या. या उड्डाणपुलासाठी १३.९२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन व ६७ सदनिका आणि दोन बंगले ताब्यात घेण्यात येणार होते. या जागेच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी महापालिकेकडे नसल्याने भूमिपूजन होऊनही काम सुरु होऊ शकले नाही. त्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी थेट याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. त्यानंतर राज्य शासनाने विशेष बाब म्हणून पुणे महापालिकेला तब्बल १८५ कोटी रुपयांचे अर्थिक मदत जाहीर केली. शासनाने अर्थिक मदत दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वतंत्र समिती नियुक्ती करुन अधिकचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करुन युध्दपातळीवर भूसंपादन सुरु केले. यामध्ये प्रशासनाला यश देखील आले असून, आतापर्यंत सुमारे ९८ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले. परंतु यामध्ये केळळ एक हेक्टर जागा ताब्यात मिळत नसल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली होती. याबाबत प्रशासनाने सर्व पातळीवर संबंधित जागा मालकांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील काही मार्ग न निघाल्याने अखेर यासाठी सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिका-यांना लेखी पत्र देण्यात आले असून, येत्या आठ-दहा दिवसांत शंभर टक्के भूसंपादन पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.----------------------एक हेक्टरसाठी प्रकल्पाची अडवणूकचांदणी चौक, कोथरुड, वाजरे, बाणेर या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौक येथे दोन मजली उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी गेल्या आठ-दहा महिन्यांपासून प्रशासनाने युध्दपातळीवर काम केले. यामध्ये प्रशासनाला यश देखील आले. परंतु केवळ दीड टक्का म्हणजे एक हेक्टर जागेचे भूसंपादन होत नसल्याने प्रकल्पाच्या कामामध्ये अडचण येत होती. अखेर हे शिल्लक एक हेक्टर क्षेत्र सक्तीने संपादीत करण्याचा निर्णय घेतला आहे.- सौरभ राव, आयुक्त
चांदणी चौकातल्या रखडलेल्या उड्डाणपुलासाठी सक्तीने भूसंपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:49 PM
चांदणी चौक येथील दोन मजली उड्डाण पुलाचे काम भुसंपादन होत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते.
ठळक मुद्देमहापालिकेचे जिल्हाधिका-यांना पत्रउड्डाणपुलासाठी १३.९२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन व ६७ सदनिका आणि दोन बंगले ताब्यात घेण्यात येणार राज्य शासनाने पुणे महापालिकेला केली तब्बल १८५ कोटी रुपयांचे अर्थिक मदत जाहीर आतापर्यंत सुमारे ९८ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण