पुणे : गाडीच्या काचा फोडून, गाडी पंक्चर झाल्याचा बहाणा करुन तसेच पैसे खाली पडले असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला अटक करुन त्यांच्याकडून कोरेगाव पार्क पोलिसांनी ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. राजशेख धनशिलन (वय ३७) आणि गिरीधरन उमानाथ (वय २०, दोघे रा. तिरुचिरापल्ली, तामिळनाडु) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, ढोले पाटील रोडवरील वेलनेस मेडिकल येथे रोडवर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीतील पुढील सीटवर ठेवलेली लॅपटॉप बॅग व इतर साहित्य असा १ लाख १२ हजार रुपयांचा माल दोघा चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद ११ एप्रिल रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना दोघे संशयित शिवाजीनगर येथील मॉर्डन कॅफे येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत कोरेगाव पार्क पोलीस ठाणे व डेक्कन पोलीस ठाण्यातील प्रत्येकी ३ आणि अलंकार व शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पार्क केलेल्या गाड्यांची काच फोडून आत ठेवलेले साहित्य हे चोरुन नेत होते.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, दीपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस अंमलदार नामदेव खिलारे, विजय सावंत, विशाल गाडे, रामा ठोंबरे, विलास तोगे, रमजान शेख, गणेश गायकवाड, विवेक जाधव, सचिन भोसले, बालाजी घोडके, प्रविण पडवळ यांनी केली.