--
मार्गासनी : लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी असल्याने वेल्हेकरांना मोठा फटका बसत आहे दोन परदेशी नागरिक वेल्ह्यात लसीकरणासाठी आले होते तसेच दररोज दिल्या जाणाऱ्या लसीकरणामध्ये ८० टक्के लोक तालुक्याच्या बाहेरील येत आहेत, त्यामुळे तालुक्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत आणि संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
वय वर्ष अठरावरील लोकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर लसीकरणाचे केंद्र निवडावे लागत आहे, पुणे शहरात लसीकरणाचे केंद्र कमी असल्याने येथील लोक लसीकरणासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालय केंद्र निवडत आहेत. त्यामुळे वेल्ह्यात पुणे शहरातील व इतर परिसरातील लोकांची गर्दी होत आहे परिणामी कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे. वेल्ह्यातील १८ गाव, मावळ, बारागाव मावळ, पानशेत परिसर आदी ठिकाणी मोबाईलला रेंज नाही कोणत्याही कंपनीचे मोबाईल टॉवर या परिसरात नाहीत. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंद करता येत नाही. तालुक्यात आतापर्यंत जवळजवळ अठरा हजार जणांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
एक मेपासून १८ वर्षावरील लोकांना लसीकरण सुरू करण्यात आले तेव्हापासून वेल्हे ग्रामीण रुग्णालय येथे दररोज शंभर लोकांना लसीकरण करण्यात येते यामध्ये ८० टक्के लोक हे पुणे शहर व इतर परिसरातून येत आहेत. ५ मे रोजी पुणे शहरात शिकणारे मुळचे इराण देशातील दोन विद्यार्थी लसीकरणासाठी वेल्हे येथे आलेले होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या या नागरिकांमुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तर तालुक्यातील लोक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.
---
कोट १
लसीकरणासाठी ऑनलाईन नोंद केली जाते लाभार्थ्यांनी जे केंद्र निवडलेले असते त्या केंद्रावर त्यांना लस दिली जाते नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लस देणे आम्हास बंधनकारक आहे.
- डॉ. अंबादास देवक,
तालुका वैद्यकीय अधिकारी वेल्हे
--
कोट २
पुणे शहर व परिसरातील नागरिकांना विनंती आहे की, वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी आहे येथील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत तरी आपण महानगरपालिका क्षेत्रातील जवळच्या लसीकरण केंद्रात लस घ्यावी.
- अमोल नलावडे,
जिल्हा परिषद सदस्य पुणे