पुणे : देशातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये सुमारे पाच लाख परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची क्षमता असताना देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी केवळ ३२ हजार परदेशी विद्यार्थीच प्रवेश घेत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची गरज आहे, असे मत असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीचे सरचिटणीस फुरकान कामर यांनी व्यक्त केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ‘उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचे बदलते स्वरूप’ या विषयावरील परिषेच्या उद्घाटन प्रसंगी कामर बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यापीठ व महाविद्यालयांमधील परदेशी विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. कामर म्हणाले, विद्यापीठांना त्यांच्या प्रवेश क्षमतेच्या १५ टक्के परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो. त्यामुळे देशातील विद्यापीठांमध्ये ४ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे. परंतु, केवळ ३२ हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. ही संख्या खूप कमी आहे. जावडेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यापीठांनी शैक्षणिक दर्जा उंचावण्याची आवश्यकता आहे. तसेच अधिकाधिक परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शैक्षणिक संस्थांनी चौकटी मोडून आवश्यक धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)पुण्यात परदेशी विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या पुण्यात ८५ देशांतील सुमारे ३ हजार परदेशी विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यातील दोन हजारांच्या जवळपास विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. तसेच सिम्बायोसिसमध्येही अनेक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
भारतात येणारे परदेशी विद्यार्थी कमीच
By admin | Published: April 10, 2017 2:50 AM