पिंपरी : आशिया खंडात नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात काळ्या पैशांची उलाढालही मोठी असल्याची चर्चा आहे. शहरातील काही राजकारणी, व्यापारी, उद्योजक, तसेच वित्तसंस्थांचे संचालक यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. आता नोटा रद्दमुळे काळा पैसा असणारे अडचणीत आले असून, श्रीमंतांच्या मुलांनी विविध देशांच्या दौऱ्यावर जाण्यासाठी अचानक बुकिंग सुरू केले आहे. केंद्र सरकारने काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी ८ नोव्हेंबरला रात्री एक हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या. व्यापारी, उद्योजक, वित्तसंस्थांचे संचालक यांनी काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जे अगोदरच परदेशात गेले आहेत, त्यांनी काळ्या पैशांची विल्हेवाट लावलीच; शिवाय काहींनी तातडीने परदेश दौऱ्याची तयारी केली. चलनातून हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्या. नोटा बदलून देणारी यंत्रणा विस्कळीत झाली. खर्चावर मर्यादा आल्या. त्यामुळे काहींनी जवळच्या पर्यटन स्थळांकडे मोर्चा वळवला आहे. परदेश दौरा करणाऱ्यांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यासाठी परदेश दौरे सहजशक्य अशी बाब झाली आहे. सहकारी बँकांचे संचालक, तसेच हॉटेल व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक यामध्ये आघाडीवर आहेत. अगदी महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले सहजपणे परदेश दौऱ्यावर जाऊन येत आहेत. परदेश दौऱ्याचा खर्च ही त्यांच्यासाठी क्षुल्लक बाब आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांना बँकेचे कर्ज काढण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. एखाद्या स्पर्धेसाठी निवड झाल्यास खेळाडूंना अक्षरश: वर्गणी जमा करून परदेशात जाण्यासाठी निधी उभारावा लागतो. त्याचवेळी काळा पैसा उधळण्यासाठी श्रीमंतांची मुले मौजमजेसाठी परदेश दौरे करीत असल्याचे काही टुरिस्ट कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.(प्रतिनिधी)
काळा पैसा उधळण्यासाठी परदेश दौरे
By admin | Published: November 15, 2016 3:18 AM