पुणे : सोशल मीडियावर ओळख वाढवून परदेशातून गिफ्ट पाठवले असल्याचे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. याबाबत एका ४१ वर्षीय महिलेने सोमवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
७ ऑक्टोबर २०२३ ते ८ जानेवारी यादरम्यान हा प्रकार घडला आहे. तक्रारदार महिलेची इव्हान गार्गे नावाच्या व्यक्तीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर दोघांमध्ये रोज संभाषण होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून भारतात स्वतःचा बिझनेस सुरु करायचा आहे तसेच घर घ्यायचे आहे, असे त्याने महिलेला सांगितले. त्यानंतर अमेरिकेतून गिफ्ट पाठवले आहे, असे सांगून व्हिसा एजंट प्रकाश सिंग याच्यासोबत संपर्क करण्यास भाग पाडले.
गिफ्टमध्ये डॉलर आणि सोने असल्याचे सांगून महिलेला क्लिअरन्स फी, कस्टम चार्जेस, मनी लाँडरिंग अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून एकूण ३ लाख ३१ हजार रुपये उकळले. महिलेला संशय आल्याने यासंदर्भात विचारपूस केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकाराचा जबाब नोंदवला. या प्रकरणी इव्हान गार्गे आणि इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक ढमढेरे पुढील तपास करत आहेत.