पुणे : आधार, युपीआय प्रणाली, डिजीलॉकर, उमंग उपयोजक, शैक्षणिक उपयोगी दीक्षा उपयोजक व संकेतस्थळ, भाषिनी उपयोजक व संकेतस्थळ, ई-संजीवनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन प्रणाली, सहकारी कृषी पणन बाजारपेठ जोडणीचा ई-नाम प्रकल्प आणि सॉईल हेल्थ कार्ड, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), डीजीट प्लॅटफॉर्म या देशाच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन पाहून परदेशी पाहुणे प्रभावित झाले. यामध्ये डिजिटल इंडिया जर्नी हा सिम्युलेटरद्वारे भारतातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी अनुभव दर्शविणारे साधनही आकर्षण ठरले आहे.
जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाने उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
भारत सरकारने राबविलेल्या आधार ओळख प्रणालीच्या उपक्रमाची माहिती सर्वांनी बारकाईने जाणून घेतली. आधार ओळख प्रणालीच्या सहाय्याने जगातील सर्वाधिक बँक खाती भारतात काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आधार क्रमांकाचा, ई- केवायसी चा उपयोग करुन थेट लाभ हस्तांतरण, अर्थसहाय्याचे थेट बॅंक खात्यात हस्तांतरण तसेच अनेक ई सुविधांशी आधारची जोडणी याबाबत यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती सांगण्यात आली.