पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.
पाटील म्हणाले, सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते एकत्र करून आम्ही त्याचे फॉरेन्सिक करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया वरुन जे काही व्हिडिओ आहेत ते तपासातून निष्पन्न होत आहेत. त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही ऍड करणार आहोत. पोलिसांची कडक भूमिका आहे जे लोक निष्पन्न होतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
पुण्यात मनसेचे आंदोलन
पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी वंदे मातरम..पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला. मोठ्यासंख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
राज ठाकरेंचा इशारा सदर घडलेल्या प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच PFIच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे.