पुणे :
किल्ले सिंहगडावरील अतिक्रमण झालेल्या स्टाॅल्सवर वन विभागाने आज पहाटे कारवाई केली. त्यामुळे गेली कित्येक वर्षांपासून इथे व्यवसाय करणारे बेरोजगार झाले आहेत. शंभरहून अधिक स्टाॅल्स काढून टाकले आहेत.
गडावरील अतिक्रमण कारवाईसाठी ५० हून अधिक वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी सात वरिष्ठ पोलीस अधिकारी व ५० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा इथे ठेवला आहे. खरंतर स्थानिक लोक पर्यटकांची सोय व्हावी म्हणून अनेक वर्षांपासून भजी, दही, चहाचा व्यवसाय करत आहेत. त्यांना आता जागा कुठे देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेते व इतर व्यावसायिकांना वन विभागाने बैठक घेऊन अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तीनच दिवस बैठकीनंतर वन विभागाने लगेच कारवाईचा बडगा उगारला आहे. वन विभागाने अचानक कारवाई केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पहाटे पाच वाजताच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व पोलीस कारवाईसाठी आले होते.
कारवाईदरम्यान 71 नोंदणीकृत व्यावसायिकांचे शेड, 64 नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांचे शेड असे एकूण 135 शेडवर कारवाई केली. गडाच्या प्रवेशद्वारासमोरील पार्किंग मधील शेड जेसीबीने काढले आहेत. एकूणच वन विभागाच्या या कारवाईमुळे स्टाॅल्सधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.