आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तेरुंगण ते वनदेव हा रस्ता व्हावा अशी गेले कित्येक वर्षांपासून या भागातील आदिवासी जनतेची मागणी होती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे हा रस्ता करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.
अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी यांच्या वनहक्क दाव्यानुसार तेरुंगण ते वनदेव या रस्त्यासाठी परवानगी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वनविभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सततचा पाठपुरावा केला व अवघ्या आठवडेभरातच जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक जयरामे गौडा यांनी काही अटी शर्तीं टाकून या रस्त्यास परवानगी दिली आहे. रस्त्याचा उपयोग पाटण खोऱ्याशी
भीमाशंकर खोरे जोडले जाणार असून, शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा माल ने आण करण्यासाठी सोपे जाणार आहे. तसेच वनदेव व वनदेव या पर्यटनस्थळास चालना मिळणार आहे, अशी माहिती माजी समाजकल्याण सभापती व आदिवासी नेते सुभाष मोरमारे यांनी दिली.