गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पावसाळ्यात अनेकदा तळजाई टेकडीवरून जोरात आलेले पाणी सोसायट्यांमध्ये जात आहे. परिणामी अनेक घरांचे नुकसान झाले. टेकडीच्या सर्व बाजूने इमारती झालेल्या आहेत. त्यामुळे उतारावरून पाणी आले की या घरांमध्ये जाते. येत्या पावसाळ्यात असा प्रकार होऊ नये म्हणून वन विभागातर्फे टेकडीवर चर खोदून छोटे छोटे तळे तयार केले जात आहेत. त्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी पर्यावरण वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली होती. त्यानंतर तिथे हा उपाय करण्यात येत आहे.
मे महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वात वरील भागात एक छोटं तळं केलं आहे. त्यानंतर तिथून पाणी खालील तळ्यात येईल, अशी तीन चार टप्प्यांवर तळी होत आहेत. वेगाने येणारे पाणी या तळ्यांमध्ये थांबणार असल्याने थेट रस्त्यावर येणार नाही.
——————————————
तळजाई टेकडीलगत म्हणजे शिंदे हायस्कूलमागे एक खाण आहे. त्या खाणीपासून एक ओढा होता. तेथून टेकडीवरील पाणी वाहून जात होते. तेव्हा कधीच पूर आलेला नाही. पण हा ओढा बुजविला गेला. त्यानंतर पाण्याचा मार्ग बदलला. त्यामुळे अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरत आहे. या ठिकाणी भिंत कोसळून एका महिेलेचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, यासाठी आम्ही दोन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. आता कुठे वन विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
- सुरेश बुद्धिसागर, रहिवासी, सहकारनगर
——————————————