वडगाव पाटोळे येथील साबळेवस्ती येथे उसाच्या शेतात बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर होता. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने गेल्या काही दिवसांपासून पिंजरा लावला होता. त्यात तो अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या परिसरात शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली होती. काही शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. कुत्रे, शेळ्या आणि जनावरे बिबट्याने फस्त केली होती. शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत होती. त्यामुळे रात्री कुणी शेतात जात नसे. वनविभागाने या परिसरात १५ दिवसांपूर्वी पांडुरंग साबळे यांच्या उसाच्या शेतालगत पिंजरा लावला होता. खाद्य म्हणून त्यात शेळी बांधली होती. पण बिबट्या चकवा देत होता. शुक्रवारी (दि. २५) सकाळी सहा वाजता त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. नागरिकांनी बिबट्या अडकल्याचे पाहून वनविभागाला फोन केला. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन माणिकडोह परिसरात सोडण्यात आले, अशी माहिती राजगुरूनगरचे वनपाल रामदास गोकुळे यांनी दिली. अडीच वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या असल्याचे गोकुळे यांनी सांगितले.
वडगाव पाटोळे (ता. खेड) येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या.