पुणे : शहर पोलीस दलातील तत्कालिन अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची बदली व्हावी या उद्देशाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या असलेली पत्रे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वाचक (रिडर) पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नाळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे शहर पोलीस दलातून अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली . त्यांची बदली करण्यात यावी यासाठी अज्ञाताने बदनामीकारक मजकूर असलेले पत्र मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पाठविली होते. या पत्रावर शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक तसेच उपनिरीक्षकांच्या बनावट स्वाक्षऱ्या होत्या. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. स्वाक्षरी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा अशा प्रकारचे पत्र पाठविण्यात आले नाही, असे अधिकाऱ्यांनी चौकशीत सांगितले. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.