लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या वाढीव बक्षिसाची तीन वर्षांपासूनची रखडलेली रक्कम दिली जाईल या नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेने दिलेल्या आश्वासनाला एक वर्ष उलटले तरीही संस्थेच्या पदरात रकमेचा धनादेश पडलेला नाही. ही रक्कम देण्याचा परिषदेला विसर पडल्याचे दिसून आले आहे. अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये केवळ स्मरणिकेतील उल्लेखापुरतेच मर्यादित असलेले नाट्य परिषदेचे अस्तित्व यापुढील काळात अबाधित ठेवायचे किंवा नाही, याबाबत आता महाराष्ट्र कलोपासक संस्था गांभीर्याने विचार करीत आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या बक्षिसाची वाढीव रक्कम देण्याचे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने आपणहून घोषित करूनही परिषदेने ही रक्कम देण्यासंबंधी हात आखडता घेतला आहे, गेल्या तीन वर्षांपासून ंमहाराष्ट्र कलोपासक संस्थेला परिषदेकडून कोणतीही रक्कम मिळालेली नाही, तरीही वाढीव रकमेच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आल्याने माघार घेता येणे शक्य नसल्यामुळे संस्थेला आर्थिक बोजा सहन करून ही बक्षिसे देण्याची वेळ येत आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कलोपासक संस्थेने नाट्य परिषद मुंबई शाखेचाही जाहीरपणे नामोल्लेख करावा अशी अट ठेवली आहे.
‘पुरुषोत्तम’च्या बक्षिसांचा विसर
By admin | Published: July 17, 2017 4:03 AM