Ajit Pawar: लोकसभेला झालं गेलं विसरा, नव्या उमेदीने कामाला लागा, अजितदादांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 06:30 PM2024-10-03T18:30:21+5:302024-10-03T18:30:41+5:30
निवडणुकीत मतभेद करण्याचा प्रयत्न केला जाईल, आपले खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका
बारामती : लोकसभा निवडणुकीत झालं गेलं विसरुन जाऊ, नव्या उमेदीने आपण कामाला लागु. आपल्यातील मतभेद, गटतट येणाऱ्या निवडणुकीत विसरावे लागतील. ही निवडणुक आपल्या दृष्टीने महत्वाची आहे, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व शहरातील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मतभेदाबाबत बोलायचं नाही, चर्चा करायची नाही. एकमेकांबद्दल ‘काॅमेंट्स’ करु नका. त्याचे काही कारण नाही, असं म्हणत एक जीवाने विधानसभेच्या कामाला लागण्याचे सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
बारामती येथे आयोजित बूथ कमिटी व कार्यकर्ता मेळाव्याला संबंधित करताना पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, आपल्याला पुढील पाच वर्षासाठी आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी गरजेचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाने सत्तेत नसतानाचे दिवस आठवा, माझे काही चुकत असेल तरी सांगा. पक्षाने सर्वांना पद मानसन्मान दिला. आता तुमची पक्षाला, पक्षाच्या उमेदवाराला गरज आहे. पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहचवा. आम्ही निवडणुकीपुरते येत नाही, आमची नाळ तुमच्याशी जोडल्याचे त्यांना सांगा, एखाद्याने प्रतिसाद न दिल्यास हात जोडून पुढे जावा. मतदारांसमवेत वैयक्तिक संवाद साधा. त्यांच्या अडचणी जाणुन घ्या. प्रभावी यंत्रणा राबवा. मतदान होइपर्यंत संस्था पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ सोडू नका. सर्व नियोजित ‘प्लॅन’ बाजूला ठेवा. आपल्यावर संस्थांची सामुहिक जबाबदारी आहे. निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाण्याची खुणगाठ बांधा. एकमेकांच्या तक्रारी करण्याएवजी विधायक काय करता येइल ते पहा. राज्यात जाताना ताठ मानेने जाता यावे,ते काम तुमच्या हातात असल्याचे पवार म्हणाले.
निवडणुकीत मतभेद करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपले खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. काही झाले तरी खचुन न जाता विश्वासाने निवडणुकीला सामोरे जा. आपले नाणं खणखणीत आहे. चुकीच्या प्रचाराला बळी पडण्याचे कारण नाही. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतील,असे देखील पवार म्हणालेे.
भांड्याला भांड लागतं, घराघरामध्ये हे घडतं. जावाजावांच्यात किती पटतं मला माहिती आहे. अलीकडे भावाभावांच्यात ही किती पटतं मला माहिती आहे. अलीकडे चुलत्या पुतण्यातही ही किती पटतं हे मला माहिती आहे. आणि बहिण भावाचं ही किती पटतं हे ही मला माहित आहे. त्याच्यामुळेच मी लाडकी बहीण योजना काढली.? आणि सगळ्याच बहिणींना खुश केले,असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार कुटुंबातील सद्यस्थितीवर मिश्कील टीपणी केली.
लोकसभा, विधानसभेला बारामतीत आतापर्यंत असं कधी झालं नाही की..? पवार मंडळी, पवार परिवार आता जेवणं घालू लागला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावू लागला आहे. नवरात्र, ईद, गणेशोत्सव मंडळांना वर्गणी देऊ लागला आहे. भरभरून द्यायला लागला आहे. तर कुठे साड्या वाटप करू लागला आहे. असे काही प्रकार चालायला लागले आहेत. हे सर्व बारामतीकरांना नवीन आहे, अशी मिश्कील टीपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
कार्यकर्त्यांनी 'इगो' लांब ठेवावा. मला ही खूप इगो आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतोय. बऱ्याचदा महिलांकडून हातात राखी बांधताना दिसतोय. हात मिळवतो. माझ्या परीने जेवढं माणसात मिसळता येईल. तेवढा प्रयत्न करतोय. जनसमान यात्रा सुरू झाल्यापासून विरोधकांवर मी एकदाही टीका केली नाही. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. जनसन्मान यात्रेत देखील विरोधकांवर टीका केली नाही. केलेली विकासकामे आणि ‘व्हीजन’वरच बोलतोय,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता यांना आवाहन केले.