--
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांचे मागील दोन वर्षांपासूनचे घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी नव्याने आलेल्या मुख्याधिकारींकडे केली आहे.
याबाबत इंदापूर नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना नगरसेवक अनिकेत वाघ, नगरसेविका राजश्री अशोक मखरे, नगरसेवक स्वप्निल राऊत, नगरसेवक अमर गाडे, नगरसेवक गजानन गवळी, नगरसेवक पोपट शिंदे यांनी निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, आज झालेल्या जनरल बोर्ड बैठकीतील मुद्दा क्रमांक ८ नुसार, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आपणास विनंती करतो की, मागील दोन वर्षांपासून आपल्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच त्यांना इंदापूर नगरपरिषदेची घरपट्टी, पाणीपट्टी व्याजासह भरावी लागत आहे. तरी लॉकडाऊन काळातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी व नागरिकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.