पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या तरुणाला स्वत:च्या गळ्यातील सोनसाखळी गहाण ठेवायला दिली आणि त्याला मदत केली; मात्र या मदतीची जाणीव न ठेवता त्याने पैसे परत केलेच नाही. उलट तो फरार झाला. या रागातून त्याचे आईवडील, बहीण यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी दत्तवाडी येथील एका २९ वर्षांच्या महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कुणाल रावळ, पांचाळ, कुणाल रावळची पत्नी व त्यांचा साथीदार अशा चौघांवर अपहणाचा गुन्हा दाखल केला. ही घटना सारसबाग ते नांदेड सिटीजवळील फ्लॅटमध्ये दि. १६ ते २० एप्रिलदरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा भाऊ संकेत टकले याला पैशांची गरज होती. तेव्हा कुणाल रावळ याने स्वत:च्या गळ्यातील सोनसाखळी देऊन ती गहाण ठेवून पैसे घेण्यास सांगितले. संकेत याने ती सोनसाखळी घेतली; मात्र त्यानंतर त्याने ती सोडवून आणली नाही; तसेच व्याजाचे पैसेही दिले नाहीत. कुणाल रावळ याने वारंवार मागणी केल्यानंतरही तो पैसे देत नव्हता. त्याचे आईवडील, बहीण यांना सांगूनही त्याने पैसे परत केले नाही. त्यानंतर तो पळून गेला. त्याच्या घरचेही पत्ताही सांगत नव्हते. त्यामुळे रावळ याने फिर्यादी, तिचा पती व आईवडील यांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना नांदेड सिटी येथील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. चार दिवस डांबून ठेवल्यानंतर २० एप्रिल रोजी रात्री दहा वाजता त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.