पुणे :ब्रह्मभावाची विविध रुपे आहेत. परंतु त्यामधील अत्यंत महत्त्वाचे असे ब्रह्मभावाचे भावरुप म्हणजे आई असे सांगत माऊलींविषयीची भावना संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली. अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानतर्फे पहिल्या माऊली आणि दिशा पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या मातोश्री मंगल नारायण नांगरे पाटील यांना माऊली पुरस्कार आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दिशा फाऊंडेशनचे डॉ. मोहन भोई, राजाभाऊ चव्हाण यांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. देखणे म्हणाले, ‘‘पंढरीच्या वारीमध्ये लाखो भाविक चालत जातात. भक्तीसाठी एकत्र आलेल्या या भक्तांच्या मनात मातृप्रेमाची भावना असते.’’ विक्रांत मोहिते यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याची भूमिका विशद केली. विराज मोहिते यांनी स्वागत केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. वृषाली मोहिते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
ब्रह्मभावाचे रूप म्हणजे आई
By admin | Published: January 11, 2016 1:40 AM