वाघोली : केसनंद येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी चावडीवर प्रसिद्ध केल्याचा लेखी अहवाल तहसीलदारांना दिला गेला आहे. परंतु, प्रत्यक्षात मतदार यादी कागदोपत्री असून, चावडीवर प्रसिद्ध केलीच नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने तलाठ्यांच्या विरोधात हवेलीच्या तहसीलदारांकडे ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी तक्रार केली आहे.केसनंद (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सदस्या दीपाली नारायण हरगुडे यांचे पद उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाल्याने त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्डस्तरीय मतदार प्रारूप यादी तयार करण्याचे काम ग्रामसेवक रतन दवणे व तलाठी संजय भोर या दोघांच्या समन्वयाचे होते. केसनंदचे तलाठी संजय भोर यांनी केसनंदच्या ग्रामसेवकांची वाघोलीच्या मंडल अधिकारी कार्यालयात लेखी स्वाक्षरी अहवाल घेऊन मतदार यादी कागदोपत्री प्रसिद्ध केली होती. मात्र, प्रारूप मतदार यादीची ग्रामसेवकांना प्रत दिली नाही. तलाठी कार्यालयाकडून काही ठराविक नागरिकांना प्रारूप मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात याची साधी प्रतदेखील उपलब्ध न झाल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी याबाबत तलाठ्यांकडे वारंवार विचारणा केली. त्यानंतर शासकीय सुटीच्या दिवशी शुक्रवारी (दि. १४) एका ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडे ही प्रत देण्यात आली. हरकत घेण्याची अंतिम तारीख ही शनिवारी (दि. १५) असल्याने या मतदार यादीत १७० मतदारांची नावे वाढल्याचे लक्षात आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. वाढीव नावांबाबत ग्रामसेवक दवणे यांच्याशी संपर्क साधला असता, तलाठी कार्यालयात सही घेतल्याचा व यादी न दिल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केसनंदच्या तलाठी व मंडलअधिकारी यांना तहसील कार्यालयात भेटून जाब विचारला. या प्रकरणी चौकशी करूनच अंतिम यादी तयार करण्याचे आश्वासन नागरिकांना दिल्याने वाद शांत झाला. तहसीलदार यावर काय कारवाई करतात, याकडे आता केसनंद ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रारूप मतदार यादी कागदावरच
By admin | Published: April 17, 2017 6:31 AM