पिंपरी : बजाज उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण, माजी खासदार राहुल बजाज (वय ८३ा) (rahul bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील एका रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांचा कर्करोगाची सुरू असणारा लढा अपयशी ठरला. बजाज यांच्या निधनाने उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थान आहे. कंपनीच्या आवारातच बजाज परिवार वास्तव्यास आहे. महिनाभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. कर्करोगाबरोबरच न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता. महिनाभरापासून प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर अखेरपर्यंत प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अल्पपरिचयवाहन उद्योगात आघाडीचा उद्योग समूह म्हणून बजाज समूहाची ओळख आहे. ४० वर्षे बजाज यांनी अध्यक्षपद भूषविले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात १० जून १९३८ रोजी राहुल बजाज यांचा जन्म झाला होता. भारतीय स्वांतत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. त्यांना वडील कमलनयन बजाज उद्योगाचा वारसा मिळाला होता. राहुल बजाज यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए केले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. त्यानंतर अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी 'एमबीए'चं शिक्षण पूर्ण केलं होते.
उमेदीच्या काळात त्यांनी बजाज इलेक्ट्रिकल कंपनीत तीन वर्षे काम केले. १९६५ साली राहुल बजाज यांनी आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. तसेच १९६८ मध्ये त्यांनी सीइओ पदाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज आॅटोने नेत्रदीपक प्रगती केली. तसेच ३० वर्षे बजाज आॅटो लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली.
कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला. ४० वर्षे त्यांनी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००५ मध्ये बजाज यांनी राजीव बजाज यांच्याकडे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोपवली. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली ओळख निर्माण केली होती. औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी २००१ मध्ये बजाज यांना पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित केले होते. तसेच २००६ ते २०१० या कालावधीत बजाज यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले. ३० एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी नॉन एक्झिकेटीव्ह डायरेक्टर आणि चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता.