किरण शिंदे
पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश बिडकर यांना पुन्हा फोनद्वारे खंडणी मागण्यात आली. रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्यानंतर गणेश बिडकर यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गणेश बिडकर हे लष्कर परिसरातील बागबान हॉटेल परिसरात होते. यावेळी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने बिडकर यांच्याकडे 25 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास राजकीय करियर संपवून टाकेन, व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकीही देण्यात आली. त्यानंतर बिडकर यांनी तातडीने पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
यापूर्वी म्हणजेच मार्च 2023 मध्ये देखील गणेश बिडकर यांना खंडणीसाठी फोन आले होते. बिडकर यांच्या मोबाईल क्रमांकावर तेव्हा व्हाट्सअप कॉल करून 25 लाखाची खंडणी मागितली होती. तेव्हा शिवीगाळ करत खंडणी न दिल्यास राजकीय करियर संपवून टाकू, बदनामी करू अशी धमकी देण्यात आली होती.