पुणे : कोथरुड मतदार संघाच्या माजी भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने मेधा कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यामुळे भाजप नेत्या मेधा कुलकर्णी अडचणीत आल्या आहेत.
रामबाग कॉलनीतील गणेशकुंज सोसायटी येथे उसाच्या रसाचे गुऱ्हाळ चालविणाऱ्या जोडप्याला मारहाण प्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार महिला व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
आपल्याला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे. कोथरुड पोलिस स्टेशन मध्ये या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. २९ वर्षीय मनिषा भोसले आणि संतोष भोसले यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली होती. संतोष आणि मनिषा भोसले हे दोघे उसाचे गुऱ्हाळ चालवतात. कोथरुड येथील गणेशकुंज सोसायटी मध्ये ते गाडा लावतात. मात्र या ठिकाणी गाडा का लावतो म्हणून या सोसायटीचे रहिवासी जयेश अनिरुद्ध कुलकर्णी आणि अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांनी आपल्याला विचारणा केली. तसेच वरील दोघांसह मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला व पत्नीला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीमुळे पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातुन आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.
कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी आता मेधा कुलकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली आहे.
याबाबत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ही घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली आहे. संबंधित उसाच्या रसाच्या गुऱ्हाळामुळे काही नागरिकांना त्रास होत होता. यामुळे नागरिकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. व ही गाडी थोडी पुढे लावण्याची विनंती केली होती. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमण विभागाने त्यांची गाडी उचलून नेली. मात्र,काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी गाडी लावली.आणि तक्रार करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
शहरात अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. आणि त्यांच्यावर कारवाई केली की याप्रकारच्या घटना घडतात. यापूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे माधव जगताप यांना देखील मारहाण करण्यात आली होती. असाच प्रकार काल दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत म्हणता येईल. हे सर्व प्रकरण त्याचवेळी मिटले होते. परंतु, कुणाच्यातरी सांगण्यावरून हे प्रकरण पुन्हा एकदा उफाळून आले आहे, असेही कुलकर्णी यावेळी म्हणाल्या. .......
महाविकास आघाडी सरकारमधील काही पक्षांनी या प्रकरणी आंदोलन करत तक्रार दाखल करण्यासाठी दबाव आणला आहे. पण मला त्यांना एकच सांगायचे आहे की; यापेक्षा त्याांनी शहरातील इतर महत्वाच्या समस्यांकडे लक्ष द्यावे.- मेधा कुलकर्णी, भाजप नेत्या.