पिंपरी : केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ, सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्षा, संसार आणि सेन्सॉरच्या लेखिका अपर्णा सतीशचंद्र मोहिले (वय ७९) यांचे बुधवारी सकाळी दहाला प्राधिकरण, यमुनानगर येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी तीनला अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपर्णा मोहिले या मूळच्या विदर्भातील. मॅट्रिक परीक्षेत मुलींमधून त्या पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर एमएपर्यंत शिक्षण घेतले. भारतीय डाक सेवेत १९६५ मध्ये त्यांची प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या पदावर निवड होणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या मराठी महिला अधिकारी होत्या. टपाल खात्यात चिफ पोस्ट मास्तर जनरल, पोस्टल सर्व्हिस डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस बोर्ड मेंबर अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले. साहित्य लेखन हा त्यांचा आवडता विषय होता. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांतही त्या पारंगत होत्या.
संसार आणि सेन्सॉर बोर्डाची जबाबदारी यशस्वी
चित्रपट परीक्षण बोर्डाच्या विभागीय अधिकारी म्हणून त्यांची सन १९७८ मध्ये निवड झाली. त्यानंतर सन १९८२-८३ मध्ये कार्यकारी अध्यक्षा होत्या. प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका विजया मेहता, वंदना विटणकर, शांता शेळके यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. १९९७-९८ मध्ये महाराष्ट्र व गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल झाल्या. ३७ वर्षे प्रशासकीय सेवा केल्यानंतर ३१ ऑगस्ट २००२ ला त्या सेवानिवृत्त झाल्या. २००७ पासून त्या निगडी प्राधिकरणातील यमुनानगर परिसरात राहात होत्या. त्यांची संसार आणि सेन्सॉर (ललितसंग्रह), त्रिदल (नाटिकासंग्रह), शब्दपुष्पांजली (कवितासंग्रह) आणि सेन्सॉर जीवनसार आणि मी (ललित लेखन) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या आजीव सदस्या व पिंपरी-चिंचवड शाखेच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या मागे मुलगा विवेक आणि मुलगी रेणुका, सून, नातवंडे असा परिवार आहे. अपर्णा मोहिले यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी तीनला अंत्यसंस्कार करण्यात आले.