पुणे : भारतीय जनता पार्टीला देशात विरोधक ठेवायचेच नाहीत, त्यामुळेच त्यांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणाचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांना इडीमार्फत दिला जाणारा त्रास त्याचाच एक भाग आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
चव्हाण यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दुपारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. सन २०१५ मध्ये बंद झालेले हे प्रकरण विनाकारण उकरून काढले जात आहे, असे चव्हाण म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मविआ नेत्यांच्या घरावर आणि त्यांच्या संपत्तीवर ईडीने धाडी टाकल्या. त्यात काही नेत्यांवर कारवाई झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि देशमुख सध्या जेलमध्ये आहेत. भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.