लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र सरकारने कार्यालयीन भाषेमध्ये ‘ळ’ या वर्णाचा समावेश केला आहे. ‘ळ’ च्या वापराबाबत केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि डॉ. सदानंद मोरे या तीन माजी साहित्य संमेलनाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रामुळे २०१८ पासून ‘ळ’च्या वापरासाठी विविध पातळ्यांवर झगडत असलेल्या प्रकाश निर्मळ यांच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
केंद्र सरकारने आपल्या कार्यालयीन भाषेत अर्थात, प्रमाण हिंदीमध्ये हा वर्ण समाविष्ट केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या वर्णाच्या प्रत्यक्ष वापराची अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व मंत्रालये व रेल्वे, टपाल, बँका अशा ठिकाणी त्वरित व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नामकरण उर्दू आणि उत्तर प्रदेशी हिंदीत ‘तिलक’ असे झाले आहे. मात्र, हिंदी समुहाच्या विविध लोकभाषांमध्येच ‘ळ’ हा उच्चार असल्याने व केंद्र सरकारच्या कार्यालयीन हिंदीनेही तो आता त्यांच्या वर्णमालेत समाविष्ट केला असल्याने यापुढे त्यांचे नामकरण ‘तिलक’ असे करु नये, असे सुचवण्यात आले आहे.आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी व या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हिंदी समूहाच्या भाषांमध्ये ‘ळ’ या अक्षराचा समावेश असूनही त्याचा उच्चार ‘ल’ असाच केला जातो. यामध्ये बदल व्हावा यासाठी २०१८ पासून केंद्र शासन, राजभाषा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार सुरु होता. सेंट्रल हिंदी डायरेक्टोरेटने ‘ळ’ वापरात आणण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले. साहित्यिकांच्या पत्रामुळे या प्रक्रियेला गती मिळू शकेल. - प्रकाश निर्मळ