लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून पुणे कॅन्टोमेंटमधील माजी नगरसेवकाने बदला घेण्यासाठी शिक्षा झालेल्या व कोविडमुळे कारागृहातून बाहेर आलेल्या दोघा कैैद्यांना सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुपारी पूर्ण करण्यासाठी शस्त्रे जमविल्याची माहिती मिळाल्याने कोंढवा पोलिसांनी दोघांना ३ गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे व १ लाख २० हजार रुपये रोकड असा माल हस्तगत केला होता. त्याच्याकडील मोबाईलची तपासणी करताना हा सुपारीचा प्रकार उघडकीस आला. यावरून कोंढवा पोलिसांनी पुणे कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव तसेच मांडवली करून हत्यारे व रोकड पुरविणारा व्यक्ती अशा चौघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजन जॉन राजमनी (वय ३८, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख (वय २७, रा. काळा खडक, वाकड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, पूर्ववैमनस्यातून बबलू गवळी याने २०१६ मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी विवेक यादव यांच्यावर गोळीबार केला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे पथकासोबत गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी सुनील धिवार यांना बातमी मिळाली होती की, येरवडा कारागृहातून कोविड रजेवर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार राजन जॉन राजमनी व त्याचा मित्र इब्राहिम शेख या दोघांनी कोणाच्या तरी खुनाची सुपारी घेतली आहे. त्यांच्याकडे पिस्तुले आहेत. राजमनी हा बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोटारसायकलवर बसून कोणाची तरी वाट पाहताना पोलिसांना दिसला. एक जण राजनला भेटायला आला. पोलिसांनी झडप घालून दोघांना पकडले. दोघांच्या अंगझडतीत राजनजवळ दोन पिस्तुले, इब्राहिमकडे एक अशी ३ काडतुसे व गाडीच्या डिक्कीत १ लाख २० हजारांची रोकड मिळून आली.
---------------------
संभाषणाच्या तपासणीत प्रकार उघड
पोलिसांनी दोघांना ठाण्यात आणून कसून चौकशी केली. त्यांच्याकडे मिळून आलेल्या मोबाईलची पाहणी केली. त्यामध्ये राजन याने व्हिके व व्हिके न्यू या नावाने सेव्ह असलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संशयास्पद संभाषण केल्याचे निदर्शनास आले. त्या संभाषणाची तपासणी केल्यावर हा खुनाची सुपारी देण्याचा प्रकार उघडकीस आला.
------------