वारजे : वारजे येथील महामार्गावरील आरएमडी कॉलेजसमोरील अंडर पासच्या चालू कामात खोडा घालून, कामगाराला मारहाण व फलक विद्रूप केल्याप्रकरणी माजी नगरसेवक व त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी यावेळी पोलिस ठाण्याला भेट देऊन निवेदन दिले.
दिलेल्या तक्रारीनुसार येथील आरएमडी अंडरपास हा महामार्ग ओलांडण्यासाठी एक बोगदा आहे. पावसाळ्यात याठिकाणी मोठा पाण्याचा प्रवाह येऊन दरवर्षी येथे गाळ साचतो. पादचाऱ्यांना ये- जा करण्यास हा मार्ग वापरता यावे म्हणून आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून येथे विकासकामे सुरू आहेत. यात या अंडरपास काँक्रिटीकरण, सुशोभीकरण व पाणी जाण्यासाठी एक छोटी भिंत घालण्यात आली आहे. येथे काम चालू असताना मंगळवारी माजी नगरसेवक हे त्यांच्या भावासह येथे येऊन त्यांनी भाजप पदाधिकारी वासुदेव भोसले यांना शिवीगाळ व येथे फलकावर नाव टाकत असलेल्या येथील कामगाराला मारहाण व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे.
यानंतर बुधवारी आमदार तापकीर व संपूर्ण खडकवासला भागातील भाजपच्या नगरसेवकांनी वारजे पोलिस ठाण्यावर गोळा होत या मुजोरीविरुद्ध सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे व निरीक्षक दगडू हाके यांच्याकडे तक्रार केली. यावेळी अंडरपासजवळ सर्वांनी जात (पोलिससह) आमदार तापकीर यांच्या नामफलकाच्या केलेल्या विद्रुपीकरणाची पाहणी केली. यावेळी प्रकरणाची तपासणी करून योग्य गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती गलांडे यांनी दिली.
श्रेयवादाचे राजकारण
दरवर्षी हा कमी उंची असलेला अंडर पास पावसाळ्यात खराब होतो. याचा वापर मर्यादित झाल्याने अनेकदा येथील पथदिवे चोरीला जातात. अनेकदा याची डागडुजी करून श्रेय लाटण्यासाठी याठिकाणी फ्लेक्सबाजी करण्यात येते. आताही आमदार व माजी नगरसेवक यांच्यात श्रेयवादाचे राजकारण रंगल्याची चर्चा आहे.