पुणे: नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी गुरुवारी सकाळी स्वराज्य पक्षात प्रवेश केला. पुण्यातील पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना ‘एबीफॉर्म’ देत नाशिक पश्चिम विधानसभामधून ते परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार असतील, असे संभाजी राजे यांनी जाहीर केले.
पक्षाचे राज्यसरचिटणीस धनंजय जाधव यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर, नाशिक यांच्यामध्ये भावाभावाचे जवळचे नाते आहे. सध्याच्या कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा स्वराज्य पक्ष व पक्षाच्या नेतृत्वाचे चारित्र्य स्वच्छ आहे ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. परिवर्तन महाशक्तीला आम्ही उत्तर महाराष्ट्रामधून बळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, असे दशरथ पाटील यांनी सांगितले.
संभाजी राजे यांनी सांगितले की, ‘महाविकास आघाडी, महायुती यांच्यात वाद सुरू आहेत, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण ते असेच करत राहणार हे सत्य आहे. आमच्यासाठी महाराष्ट्राला चांगला पर्याय देणे आज अतिशय महत्त्वाचे आहे. तोच प्रयत्न आम्ही स्वराज्य पक्ष तसेच परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून करतो आहोत. आमच्या परिवर्तन महाशक्तीच्या जागांची दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. राज्यातील अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संभाजी राजे यांनी यावेळी केल्या.
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीत उतरावे, असेच आमचे मत आहे. तसे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांचे व आमचे उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे राज्यातील बिघडलेले राजकारण नीट करणे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत.- संभाजीराजे छत्रपती