पुणे, दि. 9 - पुणे मनपाचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांचे शनिवारी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. खिलारे यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. खिलारे यांनी जवळपास 25 हून अधिक वर्षे नगरसेवक म्हणून कार्य केले होते. पुणे विद्यार्थी गृहचे ते चेअरमन होते. तसेच 1970 -71 मध्ये ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते. 1990 - 91 या काळात ते पुणे मनपाच्या महापौरपदी विराजमान झाले. मात्र, यानंतर आपण निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते.
भाऊसाहेब खिलारे यांनी काही काळ जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून कार्य केले होते. भाऊसाहेब खिलारे यांनी पुणे मनपाचे महापौरपद भूषवताना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मदतीने शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. महापौर कसा असावा? याचा वस्तूपाठ त्यांनी निर्माण केला. सौजन्य, नीतिमत्ता, संस्कृती या सद्गुणांची परंपरा महानगरपालिकेत ज्यांनी निर्माण केली, त्यात भाऊसाहेब खिलारे यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते.